Monday, May 24, 2010









प्रवास म्हटलं की कसं सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. काही क्वचित खेददायक प्रसंगांसाठी केलेला प्रवास सोडता प्रवास नेहमीच आनंद देऊन जातो. प्रवास मग तो अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, खानदेशापासून विदेशापर्यंत, शनिवारवाड्यापासून राणीच्या राजवाड्यापर्यंत किंवा पर्वतीपासून एव्हरेस्ट पर्यंत कुठचाही असला तरी निखळ आनंद आणि अनुभवांची शिदोरी नेहमीच देत असतो. कधीकधी अगदी ४/५ महिने आधी माहिती काढून, हॉटेल, विमान, रेल्वे, लोकल टूर्स सगळं नीट आखून केलेला असतो तर कधी आदल्यादिवशी रात्री १२ वाजता "हवा मस्त आहे..विकएंड ला कोकणात ड्राईव्ह करून यायचं का?" असा फोन आल्याने २ मिनिटात ठरलेला असतो. कधी कामानिमित्त सकाळी जाऊन संध्याकाळी परत अशी बिझनेस ट्रिप असते तर कधी ऑफिस मधल्या मंडळीं बरोबर केलेली पिकनिक असते. कधी वारीमधे किंवा ट्रेक मधे चालत केलेला १/२ दिवसांचा प्रवास असतो तर कधी विमान, क्रुझ ह्यानी केलेला ऐश-आरामाचा प्रवास असतो.

कधी प्रवासाच्या तयारीची धांदल होते तर कधी अगदी व्यवस्थित तयारी केलेली असली तरी कल्पना न केलेल्या समस्या उभ्या राहून गोंधळ उडतो. कधी प्रवासात पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे, शिल्प, वास्तू, निसर्ग अतिशय अद्भुत असा अनुभव देऊन जातात तर कधी प्रवासात भेटलेल्या व्यक्ती मनात कायमचं घर करून बसतात. कधी एखाद्या गावाचा, शहराचा चेहरामोहरा आपल्याला आवडून जातो तर कधी एखाद्या ठिकाणाबद्द्ल आपल्या मनात असलेल्या प्रतिमेशी ते ठिकाण न जुळल्याने अपेक्षाभंग होतो